जलदूत २.० चे उद्घाटन

Sevavardhini    06-Jun-2019

जलदूत २.० चे उद्घाटनजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सेवावर्धिनीच्या जलदूत २.० या प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक ५ जून २०१९ रोजी झाले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमास 'प्राज' इंडस्ट्रीजचे संस्थापक व सेवावर्धिनीचे मानद अध्यक्ष श्री. प्रमोदजी चौधरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या बरोबर Atlas Copco (India) Ltd. च्या Water for All या सामाजिक उपक्रमाचे विश्वस्त श्री. कबीरजी गायकवाड आणि सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे अधिकारी श्री. अभिजीतजी पाटील तसेच सेवावर्धिनीचे कार्याध्यक्ष श्री. किशोरजी देसाई व कार्यवाह श्री. सोमदत्तजी पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना श्री. प्रमोदजी चौधरी यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरातील जलसंवर्धनाची गरज अधोरेखित केली. जलसंवर्धनाबाबतचे असेच प्रबोधन व प्रशिक्षण शहरातही होणे आवश्यक आहे, सेवावर्धिनीने या कामी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. कबीरजी गायकवाड यांनी विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।याचा उल्लेख करून ज्ञान संपादन ही काळाची गरज आहे हे सांगितले. जनसामान्यांना जलसंवर्धनाच्या विविध पध्दतींचे प्रशिक्षण आधुनिक काळानुसार देऊन जागरूक करणे व आपल्या गावासाठी आणि पर्यायाने देशासाठी काम करायला प्रवृत्त करणे हे महत्वाचे आहे. या व अशा कामांसाठी एटलास कॉपको नेहमीच सहकार्य करते. जलदूत प्रकल्पामुळे असे शास्त्रीय प्रशिक्षणाचे काम होत आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले व प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. प्रमोदजी कुलकर्णी यांनी जलदूत प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी जलपूजन केले. जलदूत १.० मधील श्री. सत्यवान देशमुख व श्री. प्रकाश वासगे या जलदूतांनी प्रकल्पातील त्यांचे अनुभव कथन केले. श्री. किशोरजी देसाई, कार्याध्यक्ष - सेवावर्धिनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर श्री. सोमदत्त पटवर्धन, कार्यवाह - सेवावर्धिनी यांनी आभार मानले.

कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने झाली तसेच सुत्रसंचालनाची जबाबदारी सौ. माणिकताई दामले, सहकार्यवाह - सेवावर्धिनी यांनी सांभाळली.