श्री. चेवांग नॉर्फेल - लद्दाख भागातील "आईसमॅन"

MVWebsite1    18-May-2018
आज सेवावर्धिनी व COEP यांच्यामुळे या वय वर्षे ७७ या अवलियाशी भेटण्याचा योग आला. रा. स्व. संघ जनकल्याण समिती प्रतिवर्षी प.पू. गुरुजी पुरस्काराने देशभरातील सामाजिक कार्यकर्त्याना सन्मानित करते. या वर्षीचा पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा पुरस्कार श्री.चेवांग नाँर्फैल (लद्दाख) यांना त्यांच्या कृत्रिम ग्लेसियर्स तयार करण्याच्या अनोख्या कामगिरीबद्दल घोषित झाला आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार दि. ११ फेब्रुवारी २०१८ रोजी सातारा येथे होणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद, सातारा येथे साय. ५.३० वा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने मा. श्री. नॉर्फेल दि. १० फेब्रुवारी रोजी पुण्यात आले होते मा. श्री. चेवांग नॉर्फेल यांच्याशी गप्पा मारण्याचा व त्यांचे कार्य समजून घेण्याचा योग आला.
 
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथील प्रा. मोहिते , बिराजदार व राठोड तसेच सिव्हिल इंजिनिअरींग मधे शिकणारे अनेक विद्यार्थी सेवावर्धिनीचे CEO प्रमोद कुलकर्णी व त्यांचे सहकारी COEP चे डायरेक्टर बोर्डाचे डॉ राजेंन्द्र हिरेमठ तसेच आम्ही सर्व विद्यार्थी परीषदेचे कार्यकर्ते असे साधारणतः १२० जण या अनोख्या व स्फूर्तीदायक व्यक्तीला जवळून बघत होतो व अनुभवत होतो. मा. श्री. चेवांग नॉर्फेल लेह शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात १९३५ साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी १५ कृत्रिम ग्लेशियर्स तयार केले आहेत, ज्यामुळे त्यांना *आइस मॅन* या टोपणनावाने ओळखले जाते .
श्री. चेवांग नॉर्फेल विज्ञान शाखेचे विद्यार्थी, त्यांनी श्रीनगरमध्ये अमर सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. १९६० मध्ये त्यांनी लखनऊ येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा कोर्स पूर्ण केला.१९६० ते १९९५ दरम्यान त्यांनी जम्मू काश्मीर सरकारच्या ग्रामीण विकास खात्यात अभियंता पदावर काम केले. निवृत्ती नंतर १९९६ ते मध्ये जलसंधारण विषयाचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून लेह न्यूट्रीशन प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले. २०१० मध्ये त्यांना जमनालाल बजाज अवॉर्ड सन्मानित करण्यात आले. २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री. चेवांग नॉर्फेल यांच्या कार्यावर आधारित “White Knight” हा लघुपट (Short Film) फिल्म श्रीमती आरती श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केला, हा लघुपट भारतातील आणि परदेशातील चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला आहे. श्री. चेवांग नॉर्फेल यांनी एकदा पाण्याचा वाहता प्रवाह पहिला जो उंच चिनार झाडाच्या घनदाट सावलीत होता. सावलीतील पाणी लवकर गोठत होते, परंतु जे पाणी या झाडांच्या बाजूने वाहत होते ते गोठत नव्हते. वाहते पाणी गोठण्याच्या या संकल्पनेवर आधारीत, त्यांनी कृत्रिम ग्लेशियर्स तयार केले. या तंत्राचा वापर करून त्यांनी नदीचा प्रवाह दरीमध्ये वळवला तसेच नदीवर अनेक बंधारे बांधून प्रवाहाचा वेग कमी केला, फे साठलेले पाणी जमिनीत मुरविले आणि त्या माध्यमातून जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविला; स्वाभाविकच हे पाणी उन्हाळ्यातील सिंचनासाठी कामी आले.
नॉर्फेल यांनी बनविलेले सर्वात मोठे कृत्रिम ग्लेशियर्स त्यांच्या Phuktsey फुक्त्से या गावात आहे. १००० फूट लांब, १५० फूट रूंद आणि ४ फूट खोल असलेले हे ग्लेसियर बनविण्यासाठी फक्त रू. ९०,०००/- इतका खर्च आला आहे आणि ते संपूर्ण गावातील 700 लोकांना पाणी पुरवत आहे. साबू, कारु, नांग गावातील लोकांना आता ऊन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत नाही. व त्या साठवलेल्या बर्फाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावार त्यांना शेती करावयास मिळते.
लडाख सारख्या डोंगराळ भागात नैसर्गिक बर्फाची साठवणूक करुन. पाणी अडवून छोटे बंधारे घालून १५ गावात हरीतक्रांती घडविणार्या नॉर्फेल यांना भेटण्याचा योग यानिमित्ताने आला. मा.प्रमोद कुलकर्णी यांनी परीचय करुन दिला. .]मनिषा पाठक यांनी “देश हमे देता है सबकुछ” हे गीत संगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गीता कुलकर्णी यांनी केले. डॉ. राजेंन्द्र हिरेमठ यांनी त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढिल योजना समजून घेतल्या. COEP मधील प्राध्यापकांनी व सिव्हिल मधील विद्यार्थ्यांनी या पाणी विषयातील व बांधलेल्या बंधार्यांची प्रश्न विचारून माहीती करुन घेतली.