Gram Vikas

MVWebsite1    15-Mar-2018
 
सेवा हे असे माध्यम आहे कि ज्याद्वारे एखादया माणसाच्या मनात प्रवेश करता येतो. अनेक भाषणांमधून जी गोष्ट साध्य होत नाही ती निस्वार्थी सेवेच्या एखाद्या छोटयाशा कृतीतून साध्य होते.
स्वातंत्रोत्तर काळात आपल्या विकासासाठी आपल्याला समाज म्हणून पुढाकार घ्यावा लागेल, शासन यंत्रणेवर रचनात्मक दबाव आणून आपल्या विकासाच्या मुद्दयांचा पाठपुरावा करावा लागेल याची जाणीव प्रबळ होऊ लागली आहे. त्याचबरोबर शासनालाही लोककल्याणाच्या योजना लोकसहभागाशिवाय प्रभावीपणे राबवता येणार नाहीत याची जाणीव झाल्याने विविध लोककल्याणाच्या योजना स्वयंसेवी, सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने राबवण्यास सुरवात झाली.
साहजिकच आज स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी वाढली आहे व त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या दैनंदिन कामामध्ये अधिक कार्यक्षमता व पारदर्शकता आणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचसोबत नव्या काळाच्या शैली-कौशल्ये व संसाधनांचा प्रभावी वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. संस्थेतर्गत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या (पदाधिकारी/ विश्वस्त, कर्मचारी व लाभार्थी / सेवितजन) क्षमताविकासाची व्यापक गरज आहे.
विविध लोकोपयोगी योजना कार्यक्रमांची माहिती, निधी स्त्रोतांची व तो मिळवण्याच्या विहित पद्धतींची माहिती असणे संस्थांसाठी आवश्यक बनले आहे. त्याचसोबत प्रकल्प संकल्पना विकसित करण्यापासून ते प्रकल्प अहवाल लिखाण - मंजूर प्रकल्पाची अंमलबजावणी - मुल्यांकन या व्यापक नियोजानानियोजनाच्या विविध टप्प्यांची माहिती असावी पाहिजे. मात्र प्रत्येक संस्थेला या सर्वच बाबींची माहिती व उपलब्धता नसल्याने हि आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने 'सेवावर्धिनी' ची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली.
सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांची वैचारिक व कल्पनांची क्षितिजे उंचावण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन सेवावर्धिनीने केले आहे. प्रकल्प अहवाल, संस्था कायद्याचा अभ्यास व त्यातील प्रस्तावित बदल, हिशोब लिखाण अशा तांत्रिक विषयांसोबत ग्रामविकास, सेंद्रिय शेती व शेती पूरक उद्योग, स्वयंरोजगार व जलव्यवस्थापन अशा विषयांना सेवावर्धिनीने प्राधान्यक्रमाने हाताळले आहे.
कुटीर व लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामोद्योग महोत्सवांचे आयोजन तसेच दीपावलीनिमित्त महिला बचतगटांच्या वस्तूंना ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे काम सेवावर्धिनीने यशस्वीपणे केले आहे. पुण्यातील कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुणांचे व्यासपीठ असणाऱ्या 'सेवासहयोग' सोबत शाळेतील गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप अभियानामध्येही सेवावर्धिनी सहभागी आहे.
सेवावर्धिनी सर्वप्रकारच्या संस्थांशी भावनिक - वैचारिक व बंधुत्वाचे नाते जोडून त्यांच्यासाठी व्यावहारिक पातळीवर अनेक प्रकारचे उद्देश आणि कार्यक्रम सहमतीने करण्यास कटिबद्ध आहे. याचबरोबर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, वेल्हे तालुक्यांमधील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज व गगनबावडा तालुक्यांमधील काही गावांमध्ये ग्रामविकासाचे प्रकल्प सेवावर्धिनी राबवत आहे.
बसर्गे ग्रामविकास प्रकल्प - कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागात येणारे एक शांतताप्रिय व प्रगतिशील गाव म्हणजे बसर्गे. हागणदारीमुक्त व दारूबंदी असणारे साडेपाच हजार लोकसंख्या असणारे असे गाव. गावाच्या विकासासाठी व पंचवार्षिक श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेसारख्या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र येऊन काम करणारे अशीही बसर्गेची ओळख सांगितली जाते. विविध नगदी व कोरडवाहू पिकांसाठी अनुकूल असणारे हवामान व जमीन तसेच प्रयोग व कष्ट करण्याची मानसिकता असणारे शेतकरी यामुळे गावाने तालुक्यामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. गावातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेले बसर्गे एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती म्हाळसादेवी हायस्कूल गेल्या पन्नास वर्षांपासून या भागाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी अखंडपणे व यशस्वीरीत्या कार्यरत आहे.
अशा या बसर्गेमध्ये सेवावर्धिनीने जून २०१४ पासून ग्रामविकासाचा प्रकल्प सुरु केला आहे. लोकसहभागातून शिक्षण, शेती व पूरक उद्योग, पाणी आणि आरोग्य या विषयांमध्ये मूल्यवृद्धीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
शिक्षण - गावातील मुला-मुलींचा शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक, आर्थिक व प्रबोधनात्मक विकास होण्यासाठी रचनात्मक कार्यक्रम राबवणे, त्यांना शिक्षणाच्या तसेच स्वयंरोजगाराच्या निरनिराळ्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचा सेवावर्धिनीचा मानस आहे. यासाठी विज्ञान व निसर्ग शिबीर, व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, अभ्यासिका, संस्कारकेंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम असे विविध उपक्रम सुरु करण्याची योजना आहे.
शेती - कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी, शास्त्रीय पद्धतींवर आधारीत, निसर्गपूरक, शाश्वत शेतीच्या माध्यमातून स्वावलंबी शेतकरी घडवणे यासाठी सेवावर्धिनी काम करत आहे. याची सुरवात शेतकरी सर्वेक्षणाने करून त्यानंतर मार्गदर्शन मेळावे तसेच प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याची योजना आहे. मधुमक्षिका पालन, गावठी कोंबडी पालन, बंदिस्त शेळीपालन, अन्नप्रक्रिया तसेच शेतीपूरक संजीवके निर्मिती अशा छोट्या उद्योगातून शेतकर्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी सहकार्यासाठी सेवावर्धिनी प्रयत्नशील आहे. गावामध्ये असे प्रात्यक्षिक शेत वाफे (model plots) तयार करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
पाणी - बसर्गेतील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरेसे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
आरोग्य - ग्रामीण भागातील महिलांचे कष्टमय जीवन व तुलनेने कमी पोषक आहार यामुळे महिला आरोग्य मोठी समस्या सर्वत्र जाणवते. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण महिलांचे आरोग्य सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्याची संस्थेची योजना आहे. महिलांनी घराच्या घरी करण्यासारखा सेंद्रिय परसबाग उपक्रमाचे प्रशिक्षण, माहिती देण्याचा प्रयत्न आहे.
गावाला आवश्यक असणारी संसाधने व सेवा गावामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून पूर्ण होणे अर्थात स्थानिक गरजा व प्रश्न गाव पातळीवर पूर्ण होणे याची आवश्यकता आहे व ग्रामविकासचे ते एक परिमाण आहे. लोकसहभाग हा ग्रामविकासाचा गाभा आहे. यासाठी गावपातळीवर विविध विषयांच्या ग्रामसमितींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे, त्यांना विकासाच्या वाटेमध्ये सहभागी करून घेणे व गावाच्या सर्वांगिण विकासामध्ये सहकार्याची भूमिका घेणे असा सेवावर्धिनीचा मानस आहे